SHRI DATTAGURU KARUNATRIPADI .
🙏🏻🏵️🙏🏻Shri Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻
🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻
॥ श्री दत्तात्रेय करुणा त्रिपदि (मराठी) ॥
— प्रथम —
शांत हो श्रीगुरुदत्ता ।
मम चित्ता शमवी आता ॥
तू केवळ माता जनिता ।
सर्वथा तू हितकर्ता ॥
तू आप्त स्वजन भ्राता ।
सर्वथा तूचि त्राता ॥
भयकर्ता तू भयहर्ता ।
दंडधर्ता तू परिपाता ॥
तुजवाचुनि न दुजी वार्ता ।
तू आर्ता आश्रय दत्ता ॥ १ ॥
शांत हो श्रीगुरुदत्ता ।
मम चित्ता शमवी आता ॥
अपराधास्तव गुरुनाथा ।
जरि दंडा धरिसी यथार्था ॥
तरि आम्ही गाउनि गाथा ।
तव चरणी नमवू माथा ॥
तू तथापि दंडिसी देवा ।
कोणाचा मग करूं धावा ॥
सोडविता दुसरा तेव्हां ।
कोण दत्ता आम्हां त्राता ॥ २ ॥
शांत हो श्रीगुरुदत्ता ।
मम चित्ता शमवी आता ॥
तू नटसा होउनि कोपी ।
दंडिताहि आम्ही पापी ॥
पुनरपिही चुकत तथापि ।
आम्हांवरी न च संतापी ॥
गच्छतः स्खलनं क्वापि ।
असें मानुनि नच होऊ कोपी ॥
निजकृपा लेशा ओपी ।
आम्हांवरि तू भगवंता ॥ ३ ॥
शांत हो श्रीगुरुदत्ता ।
मम चित्ता शमवी आता ॥
तव पदरीं असता ताता ।
आडमार्गीं पाऊल पडतां ॥
सांभाळुनि मार्गावरता ।
आणिता न दूजा त्राता ॥
निजबिरुदा आणुनि चित्ता ।
तू पतितपावन दत्ता ॥
वळे आतां आम्हांवरता ।
करुणाघन तू गुरुनाथा ॥ ४ ॥
शांत हो श्रीगुरुदत्ता ।
मम चित्ता शमवी आता ॥
सहकुटुंब सहपरिवार ।
दास आम्ही हे घरदार ॥
तव पदी अर्पू असार ।
संसाराहित हा भार ॥
परिहरिसी करुणासिंधो ।
तू दीनादयाळ सुबंधो ॥
आम्हां अघ लेश न बाधो ।
वासुदेव प्रार्थित दत्ता ॥ ५ ॥
शांत हो श्रीगुरुदत्ता ।
मम चित्ता शमवी आता ॥
— द्वितीय —
श्रीगुरुदत्ता जय भगवंता ।
ते मन निष्ठुर न करी आता ॥
चोरे द्विजासी मारीता मन जे ।
कळवळले ते कळवळो आता ॥
श्रीगुरुदत्ता जय भगवंता ।
ते मन निष्ठुर न करी आता ॥ १ ॥
पोटशूळाने द्विज तडफडता ।
कळवळले ते कळवळो आता ॥
श्रीगुरुदत्ता जय भगवंता ।
ते मन निष्ठुर न करी आता ॥ २ ॥
द्विजसुत मरता वळले ते मन ।
हो की उदासीन न वळे आता ॥
श्रीगुरुदत्ता जय भगवंता ।
ते मन निष्ठुर न करी आता ॥ ३ ॥
सतिपति मरता काकुळती येता ।
वळले ते मन न वळे की आता ॥
श्रीगुरुदत्ता जय भगवंता ।
ते मन निष्ठुर न करी आता ॥ ४ ॥
श्रीगुरुदत्ता त्यजी निष्ठुरता ।
कोमल चित्ता वळवी आता ॥
श्रीगुरुदत्ता जय भगवंता ।
ते मन निष्ठुर न करी आता ॥ ५ ॥
— तृतीय —
जय करुणाघन निजजनजीवन ।
अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥
निज-अपराधे उफराटी दृष्टी ।
होऊनि पोटी भय धरू पावन ॥
जय करुणाघन निजजनजीवन ।
अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥ १ ॥
तू करुणाकर कधी आम्हांवर ।
रुसशी न किंकर वरद कृपाघन ॥
जय करुणाघन निजजनजीवन ।
अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥ २ ॥
वारी अपराध तू मायबाप ।
तव मनी कोप लेश न वामन ॥
जय करुणाघन निजजनजीवन ।
अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥ ३ ॥
बालक-अपराधा गणे जरी माता ।
तरी कोण त्राता देईल जीवन ॥
जय करुणाघन निजजनजीवन ।
अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥ ४ ॥
प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव ।
पदी देवो ठाव देव अत्रिनंदन ॥
जय करुणाघन निजजनजीवन ।
अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥ ५ ॥
Please do copy paste !!!
कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!.
Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻
🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻
तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?
हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार . हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे . जिथे दत्त गुरू आणि स्वामींमध्ये काही अंतर नाही तिथे दत्त उपासक हेच स्वामींचे सेवक हे सिद्ध होते .
तर माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या सगळ्यांना . माझ्या ब्लॉग वरील सर्व पोस्ट तुम्ही तुम्हाला जमेल तसे तुमच्या ओळखीतील सर्व स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींना पाठवा . ज्यांच्या कडे ह्यातील कुठलेच ग्रंथ नाही आहे त्यांच्या पर्यंत पोहचवण्याची एक छोटीशी स्वामी सेवा स्वामी माझ्या कडून करून घेत आहेत . तर त्या स्वामी सेवेत तुम्ही पण शमील वाहा आणि गरजवंत कडे ह्या माझ्या ब्लॉग वरील पोस्ट पोहचुदे .
Home 👇🏻👇🏻👇🏻
Comments
Post a Comment